chikhli

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

अभंगानंद

सागराने गावे
गीत जीवनाचे
संगीत प्रेमाचे
जगा द्यावा

आकाशाने द्यावे
भरून आभाळ
मायेचा वर्षाव
जगा द्यावा

फुलांनीही द्यावा
गंध जीवणाचा
आनंदाचा कंद
जगा द्यावा

रविने ही द्यावी
ओतून सकाळ
प्रकाश सकळ
जगा द्यावा

रवींद्र खानंदे

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४



वारे तुझ्या स्मृतींचे...


आकाश  चांदण्यांनी बहरुन आज गेले
वारे तुझ्या स्मृतींचे स्पर्शून आज गेले

मल्मल तुझ्या स्मृतींची हूंगतोच आज आहे
हे ताटवे फुलांचे बहरून आज गेले

तो दीप तेवतांना मन जाळतो कितीदा
ते तार सप्तकांचे  छेडून आज गेले

मी ऐकतोच आहे ते गीत भैरवीचे
ह्या फाटल्या मनाला जुळवून आज गेले

मी पांघरून घेतो मऊशाल ही धुक्याची
आभास ग तुझे ते भुलवून आज गेले


पाऊसपान

किती केले पाऊसपान

भागली नाही माझी तहान

एक थेंब दंवाचा

एक थेंब पावसाचा
केली तुलना किती वेळ
नुसता झाला पोरखेळ
दंव गेले उडुन
पाणी गेले विरुन

पाऊस असतो तुझ्यासाठी
घडवून आणतो कधी गाठी

करावे का पाऊसपान ?
तुला पण लागली असेल तहान......!

-रवींद्र खानंदे



खूणगाठी 

तुझ्या पावलाने बाटलेला गाव
कसा हा लगाव लागलेला

मुक्या मुक्या रडे अबोल निंभोर
मागे चितचोर लपलेला

निघाली पालखी गाव झाले खाली
पिंपळ सावली रडे किती !

देऊळमळाले विटले हे रंग
पूर्णेचे तरंग शोधू कोठे ?

हरवला गाव स्मृती झाली अधू
आता कोठे शोधू खूणगाठी?



                                                          .........................  रवींद्र खानंदे