chikhli

शनिवार, १२ जुलै, २०१४

 

 

आभाळ पान्हा.....


हरवला गाव
कुठे शोधू खुणा
पुर्णाकाठ सुना
सुकलेला

गेली गेली कुठे
आभाळ सावली
नाही ती गावली
आसपास

राहिले गर्भार
केवडयाचे उन्हं
वसंताचं तान्हं
प्रसवेल

सुवास कस्तुरी
भन्नाट सुटला
छातीत दाटला
ओला पान्हा

--- रवींद्र खानंदे, चिखली


 || स्मृतीचे देऊळ ||


गजर दिंडीचा
ऐकू येई कानी
तुकयाची वाणी
कोण गाई ?


दुरचे ते दिवे
लावतात कळ
मनी तळतळ
येथे माझ्या


गंध चंदनाचा
हुंगतो अजून
मनात भिजून
गेलो आता


दाटले दाटले
केवढे आभाळ
स्मृतीचे देऊळ
भिजलेले


रवींद्र खानंदे,
चिखली.

पावसा तू असा ये....


थेंब टपोर घेऊन उधळत घोडयासारखा
तापलेल्या भुईवर मोती सडा शिंपीत ये.....
रुणझुणत्या पैजणांनी नाचत कृष्णासारखा
कस्तुरी चा सुगंध घेऊन ये......

झाडातुन घोंघावत मोर पिसारा फुलवत
नदीकाठच्या बोरबनातून तू असाच लोळत ये.....
उललेल्या शेतातुन शिवारातल्या आमराईतुन
मृगधारा गुंफीत ये....

.......... रवींद्र खानंदे









चंद्र अमृताचा

चंद्र अमृताचा
तुझ्या स्मृतीत नहाला||
हलाहल कंठी
जीव कासाविस झाला||

चांदण्याची रात

धुके सुगंधी अंगणी ॥
देवळात दिवा
झुरतो मनोमनी ॥

-रवींद्र खानंदे